बारामतीत सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे.
खरं तर गेल्या 25 जुलै रोजी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या व्हिडिओमध्ये एक युवक दुचाकी फूटपाथवरून भरधाव वेगाने नेत होता. यामुळे फुटपाथवरून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत होता. अशाप्रकारे तो फुटपाथवर जीवघेणी स्टंट करून नागरीकांचा जीव धोक्यात घालत होता. त्यामुळे पोलिसांनी या युवकाचा शोध सूरू केला होता.
advertisement
यावेळी या व्हिडिओचा माग काढत बारामती वाहतूक शाखेने (एम.एच 42 बी.पी. 0090) ही दुचाकी गाडी तात्काळ शोधून काढली. तसेच संबंधित युवकाची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटली.त्यानंतर वाहतूक शाखेने गाडी ताब्यात घेऊन (मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार) नोटीस बजावली. त्याचबरोबर सदर दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, या कारवाईत आत्ताच्या वाहतूक नियम उल्लंघनाबरोबरच यापूर्वी त्याच गाडीवर फूटपाथवर 'नो पार्किंगचा' जुना दंडही बाकी असल्याचे उघड झाले असून तोही वसूल करण्यात आला आहे. त्याबरोबर या चालकावर खटला तयार करून कोर्टात पाठविण्यात आला.अशा प्रकारे फूटपाथचा वापर चुकीच्या पद्धतीने करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे.