बीड जिल्ह्यातून एक अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आणि दुर्दैवी घटना समोर आली. काटवटवाडी गावात अवघ्या सात महिन्यांच्या एका चिमुकलीचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू झाला. आरोही आनंद खोड असं मृत चिमुकलीचे नाव आहे. ही घटना काल दुपारच्या सुमारास घडली. आरोही घरात खेळत होती. खेळता-खेळता तिने खाली पडलेले चॉकलेट पाहिले आणि ते उचलून तोंडात टाकले.
advertisement
लहान बाळाला गिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे चॉकलेट तिच्या घशात अडकले. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हे लक्षात येताच, घरातील लोकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.चॉकलेट घशात पूर्णपणे अडकल्यामुळे तिला श्वास घेणं कठीण झालं, ही गंभीर परिस्थिती पाहून कुटुंबीयांनी तात्काळ तिला जवळच्या डॉक्टरकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारासाठी वेळ न मिळाल्याने तिची अवस्था अधिकच खालावली. शेवटी, तिला जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नातेवाईक धावले. मृतदेहाला कुशीत घेऊनच त्यांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. पण दुर्दैवाने, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे खोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीचा असा अचानक आणि दुर्दैवी अंत झाल्यामुळे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली. खाली पडलेल्या गोष्टी, लहान मुलांच्या हातात जे काही असेल ते तोंडात घालणार नाहीत ना हे देखील पाहाणं गरजेचं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.