मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. वाल्मिक कराड हा प्रकरणाचा मास्टरमाईंड असून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत त्याचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
वाल्मिक कराडबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाळेमुळे खणून काढणार असून मास्टरमाईंड कोणीही असून त्याला शिक्षा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, वारंवार वाल्मिक कराडचे नाव घेतलं गेलंय, त्यामुळे सांगतो की , या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्या सोबत, पवार साहेबांसोबतही फोटो आहेत. तो कोण आहे, कोणत्या पक्षाचा आहे, त्याचा विचार न करता कारवाई करण्यात येणार आहे. एका प्रकरणात तो आरोपी आहे, त्यात कारवाई होणाच, पण या प्रकरणात पुरावे मिळाल्यानंतर त्याला सोडणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनात काय म्हटले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत परभणी हिंसाचार आणि बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन सादर केले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मस्साजोगचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपुरतं प्रकरण नाही. याची पाळेमुळे खणावी लागतील. एव्हाडा एनर्जी यांनी बीडमध्ये पवनचक्की मध्ये गुंतवणूक केली आहे. यातून काही लोकांना रोजगार मिळत आहे. आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या असा प्रकार सुरू आहे.
अशोक घुले, नारायण घुले. प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. तेथील वॉचमनला मारहाण केली. पीडितांनी सरपंचांना फोन केला.आरोपी बाजूच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काहीजण तिथे पोहचले. त्यांना चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.
सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता,पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण ही निर्घृण हत्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात म्हटले.
