बहुचर्चित बीड-अहिल्यानगर रेल्वे मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी (17 सप्टेंबर) रोजी चालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच यासंबंधीची माहिती नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात दिली. मराठवाड्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या परळी-बीड-नगर मार्गासाठी मागील अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. पहिल्या टप्प्यात नगर ते आष्टी रेल्वे सुरू करण्यात आली. संबंधित डेमूला अमळनेर भांडे गावापर्यंत चालवले जात आहे. बीडपर्यंतचे वायरिंग आणि सिग्नलिंगचे काम सुरू आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर आणि बीड मार्गाचा डीपीआर बनवण्याचे काम सुरू असून नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर बीड ते परळी पुढील मार्गाचे मातीकाम 90 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीड ते अहिल्यानगर रेल्वे धावणार असल्याचे नोटिफिकेशन अद्याप रेल्वे विभागाने जाहीर केले नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील मार्ग म्हणून याकडे बघितले जाते. स्व. मुंडे यांच्या मागणीनंतर संबंधित मार्गासाठी वेळप्रसंगी आंदोलने झाली. दोन वर्षांपूर्वी नगर ते आष्टी अशी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली.
संभाजीनगर-अहिल्यानगर मार्गाच्या घोषणेकडे लक्ष छत्रपती संभाजीनगर ते बीड मार्गाच्या सर्वेक्षणासाठी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी विशेष पाठपुरावा केला. डॉ. कराड यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित मार्गाच्या डीपीआरसाठी रेल्वे बोर्डाकडून प्रक्रिया राबवली जात आहे. मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विणण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल. छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या नवीन मार्गासाठी सर्वांना उत्कंठा आहे. या मार्गाची घोषणाही रेल्वेकडून अपेक्षित आहे.