10 फेब्रुवारी रोजी केंद्र क्रमांक 224 येथे झालेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान तब्बल 16 परीक्षा दालनांमध्ये पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास प्रतिबंध न करता उलट मदत केल्याचे दृश्य समोर आले. या प्रकारामुळे शासनाच्या ‘कॉपीमुक्त परीक्षा’ मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने तातडीने अहवाल सादर करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
advertisement
या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री 17 जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ गैरप्रकार प्रतिबंधक कायदा 1982 तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी केंद्रावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपासाला वेग दिला असून संबंधितांची चौकशी सुरू आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये केंद्र संचालक, विविध महाविद्यालयांतील शिक्षक आणि पर्यवेक्षकांचा समावेश आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, परीक्षेतील गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, बीड जिल्ह्यात एकूण 103 केंद्रांवर सुमारे 45 हजारांहून अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. अशा परिस्थितीत पारदर्शक व निःपक्षपाती परीक्षा प्रक्रियेवर विश्वास टिकवण्यासाठी प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही सतर्कता वाढवण्यात आली आहे.






