मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आतापर्यंत अनेक उमेदवारींनी अर्ज भरले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करत नार्वेकरांनी आपला अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करत असताना नार्वेकरांनी शपथपत्र सादर केलं आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडे ७ कोटी १७ लाखांची संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे ८ कोटी ५३ लाखांची जंगम मालमत्ता आहे. राहुल नार्वेकर यांच्या नावे जवळपास २८ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर पत्नीच्या नावे ८५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. राहुल नार्वेकर यांच्यावर १७ कोटी रुपयांचं कर्ज तर ६६ कोटी रुपयांचे कर्ज पत्नीच्या नावावर देखील आहे.
advertisement
राहुल नार्वेकर यांच्याकडे चार चारचाकी गाड्या आहे. यामध्ये मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एसयुव्ही आणि फॉर्च्युनरचा समावेश आहे. एवढंच नाहीतर राहुल नार्वेकर यांच्याकडे १६० ग्राम सोनं आहे. ज्यांची किंमत जवळपास ११ लाख ६८ हजार रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे जवळपास ६६० ग्राम सोनं असून ज्याची किंमत ४८ लाखांच्या घरात आहे.
जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज केला दाखल
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मार्केट या ठिकाणाहून शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोठ्या संख्येने कुलाबावासीय या रॅलीत एकवटलेले होते. कुलाबा येथील गणेश मंदिरात दर्शन घेत नार्वेकर यांनी आपल्या रॅलीची सुरुवात केली होती. जे जे स्कूल ऑफ आर्ट या ठिकाणी असलेल्या निवडणूक कार्यालयात राहुल नार्वेकर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल नार्वेकरांनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचे औक्षण करण्यात आले आहे. आपला मुलगा यावेळी ही शंभर टक्के निवडून येईल असा विश्वास त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेला आहे. नार्वेकर यांच्या वडिलांनी पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.
