मुंबई-नागपूर फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते नागपूर अशी ही साप्ताहिक सुपरफास्ट सेवा 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर 2025 दरम्यान उपलब्ध राहील. गाडी क्रमांक 02139 ही एलटीटीवरून प्रत्येक गुरुवारी मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 02140 ही नागपूरहून प्रत्येक शुक्रवारी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 10 मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. या गाड्या प्रत्येकी दहा फेऱ्या धावतील. या गाडीसाठी इतर नियमित गाड्यांच्या तुलनेत सुमारे एक तृतीयांश जास्त तिकिट आकारलं जाणार आहे.
advertisement
कोच रचना कशी असेल?
दोन्ही गाड्यांना 20 डबे असतील. त्यात 10 जनरल सेकंड क्लास, 5 स्लीपर, 3 एसी थर्ड क्लास आणि 2 गार्ड-कम-लगेज व्हॅनचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ आरक्षण करून प्रवासाची सोय निश्चित करण्याचं आवाहन केलं आहे.
एलटीटी-गोमतीनगर विशेष गाडी
मुंबई-नागपूर गाड्यांसोबतच, एलटीटी-गोमतीनगर-एलटीटी या मार्गावरही 28 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर 2025 या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्या धावतील. प्रत्येकी सहा फेऱ्या या कालावधीत चालवल्या जाणार आहेत.
बिलासपूर-यलहंका फेस्टिव्हल स्पेशल
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने देखील प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. बिलासपूर-यलहंका (बंगळुरू)-बिलासपूर या मार्गावर 22 फेऱ्या चालवण्यात येतील. गाडी क्रमांक 08261 ही बिलासपूरहून प्रत्येक मंगळवारी सुटेल. ही गाडी 18 नोव्हेंबरपर्यंत सोडली जाणार आहे. गाडी क्रमांक 08262 ही यलहंकाहून प्रत्येक बुधवारी सुटेल. ही गाडी 19 नोव्हेंबरपर्यंत सोडली जाणार आहे.
या गाड्यांना बिलासपूर, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, वडसा, चांदाफोर्ट आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे दिले आहेत. या सणासुदीच्या काळात रेल्वेने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.