सिल्लोड शहरातील यशवंतनगर भागात राहणाऱ्या चंद्रकलाबाई रामदास साळवे (वय 65) या वृद्ध महिला शहर व ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करून उदरनिर्वाह करत होत्या. ओळखीतील अलका देवीदास गाडेकर (रा. पिंप्री) हिने ‘पिंप्री गावात जास्त मजुरी मिळेल’ असे सांगून चंद्रकलाबाईंना घरी बोलावले. मात्र, त्या घरी पोहोचल्यानंतर अचानक चंद्रकलाबाईंना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
मृत्यू झाल्यानंतर सत्य समोर येईल या भीतीने आरोपी महिलेने क्रूर निर्णय घेतला. मृतदेहाची माहिती न देता, एका रिक्षाचालकाच्या मदतीने 21 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता चंद्रकलाबाईंचे प्रेत रिक्षात टाकून पिंप्रीपासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव पेठजवळील नाल्यात फेकून दिले. अंगावरील 90 हजारांचे 41 सोन्याचे मणी, 7 ग्रॅम सोन्याची पोत, 29 भार चांदीचे कडे, पाटली आदी दागिने काढून घेतले.
सोमवारी दुपारी नाल्यात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मंगळवारी मृत महिलेचा मुलगा समाधान साळवे यांनी संशय व्यक्त करत सिल्लोड ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
चंद्रकलाबाईंचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मृत्यूनंतर दागिने काढून प्रेताची विल्हेवाट लावल्याचा गंभीर गुन्हा उघड झाल्याने पोलिसांनी 66 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी महिलेला अटक केली. गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिच्या ताब्यातून सर्व दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.






