छत्रपती संभाजीनगर : प्रत्येकजण आपापल्या परीनं देवाची सेवा करत असतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये विठूरायासाठी एक खास उपक्रम राबवण्यात आलाय. 'एकतरी लाडू माझ्या पांडुरंगाला' असं या उपक्रमाचं नाव असून मागील 17 वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त तो राबवला जातो.
मनोज सुर्वे आणि डॉक्टर भैरव कुलकर्णी या दोघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला होता. या अंतर्गत दरवर्षी 51 हजार लाडू बांधण्याचं काम केलं जातं. शेंगदाणे आणि गुळापासून बनवलेले हे लाडू पंढरपूरला पाठवले जातात. आषाढी एकादशीनिमित्त हे लाडू सर्व भाविकांना प्रसाद म्हणून मिळतात.
advertisement
हेही वाचा : वारकऱ्यांसाठी GI मानांकन प्राप्त खव्याचे पेढे! लवकरच पोहोचणार पंढरपुरात
यंदा लाडू बांधण्याचं काम छत्रपती संभाजीनगर शहरातील बालाजी नगरात सुरू आहे. इथं लाडू बनवण्यासाठी अनेक भाविक दाखल झाले आहेत. अगदी लहान मुलांनी चक्क विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा केली आहे. भजन, कीर्तन, अभंग म्हणत अत्यंत प्रसन्न वातावरणात इथं लाडू बनवण्याचं काम सुरू असतं. शेंगदाणे कुटण्यापासून सर्व कामं भाविकच अगदी भक्तिभावानं करतात.
'मी आणि मनोज सुर्वे यांनी मिळून 17 वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. याही वर्षी आम्ही हा उपक्रम राबवत असून, इथं बांधले गेले लाडू पंढरपुरात नेऊन भाविकांना प्रसाद म्हणून देतो, हे करताना आम्हाला खूप आनंद होतो. हे काम आम्हाला असंच पुढे सुरू ठेवायचंय', असं आयोजक डॉ. भैरव कुलकर्णी यांनी सांगितलं. तर, 'याठिकाणी लाडू बांधताना आम्हाला खूप आनंद होतो, आपणसुद्धा पांडुरंगाला काहीतरी देत आहोत, त्याची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते याचा आनंद आहे, आम्ही आतुरतेनं या दिवसाची वाट पाहत असतो, असं भाविकांनी सांगितलं.





