कन्नड आगाराची बस (क्रमांक एमएच 15, बीटी- 3038) बुधवारी दुपारी तीन वाजता कन्नड येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. गल्लेबोरगाव येथून या बसमध्ये कांताबाई बसल्या व त्यांनी वेरूळचे तिकीट घेतले. बस पळसवाडी परिसरातून जात असताना अचानक दरवाज्याकडे जाऊन त्यांनी धावत्या बसमधून उडी मारली. यात बसच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वाहक व प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला काहीशी अस्वस्थ होती.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस मनोहर पुंगळे, बीट जमादार राकेश आव्हाड, महामार्ग पोलिस सपोनि. इंगोले, रामनाथ भुसारे, राठोड, शांताराम सोनवणे, शरद दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी चालक, वाहक, तसेच प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
वाहक रंजना सोनवणे यांनी सांगितले की, “ गल्लेबोरगाव येथून महिला बसमध्ये बसलेली होती. महिला प्रवासभर शांत आणि काहीशी अस्वस्थ दिसत होती. आम्हाला काही समजण्याआधीच तिने दरवाज्याकडे जाऊन उडी घेतली.” चालक बळीराम राठोड यांनीही तत्काळ बस थांबवली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.






