राज्यात यंदा झालेल्या विक्राळ पावसामुळे खरिपाच्या तब्बल १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला, मात्र सर्वाधिक तडाखा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, घरसंसार उद्ध्वस्त झाला आणि पशुधनही पाण्याच्या प्रवाहात नष्ट झाले.
advertisement
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, पुरामुळे, पावसामुळे 26 लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना विविध कामांसाठी करायची मदत असेल, घरांच्या नुकसानापासून ते वेगवेगळ्या मदतीसाठीचा एक निर्णय घेणार आहोत. दिवाळीच्या पूर्वी पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
ओला दुष्काळ जाहीर होणार?
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. शासकीय टर्ममध्ये ओला दुष्काळ ही संज्ञा नाही. मात्र, राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाच्या वेळी लागू होणारी टंचाई हा मुद्दा ग्राह्य धरून मदत केली जाणार आहे. ओला दुष्काळ ही संज्ञा नाही. तरीदेखील पूरग्रस्तांसाठी, शेतकऱ्यांसाठी मदत सरकार करणार आहे. सध्या सगळी माहिती जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात शेतकर्यांना करण्यात येणाऱ्या मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
महापुराचे परिणाम
या आपत्तीमुळे सुमारे ४७ टक्के खरिप क्षेत्र बाधित झाले असून खरिप हंगाम जवळपास संपुष्टात आला आहे. धाराशीव, जालना, बीड, लातूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती उद्ध्वस्त झाल्याने भाजीपाला, धान्य आणि अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यातच गाई-म्हशींचा मृत्यू, चाराही वाहून जाणे यामुळे दुधाच्या उत्पादनावरही फटका बसणार आहे. त्यामुळे पुढील काळात अन्नधान्याबरोबरच दुधाच्या किमतीतही भरमसाठ वाढ होण्याची चिन्हे आहेत.