मुंबई : विजयादशमीच्या निमित्ताने महाराष्ट्रात यंदा राजकीय आणि सामाजिक पातळीवर पाच महत्त्वाचे मेळावे व संमेलने रंगणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेनेचे दोन्ही गट, मंत्री पंकजा मुंडे, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील तसेच नागपूरमधील धम्मचक्र संमेलन अशा विविध व्यासपीठांवरून होणाऱ्या भाषणांकडे राज्याचे लक्ष असणार आहे. तर, दुसरीकडे या संघटना, पक्षांच्या समर्थकांना विचारांचे सोनं लुटण्याची संधी मिळणार आहे.
advertisement
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये पारंपरिक संचलन होणार असून, शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत कोणता संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या वर्षभर चालणाऱ्या शताब्दी वर्षाच्या उपक्रमांना याच दिवशी प्रारंभ होणार आहे.
राजकीय आघाडीवर शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळाव्यांतून आपापली ताकद दाखवणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचा पारंपरिक मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग इथून फुंकले जाईल. उद्धव ठाकरे हे मनसेसोबत युतीबाबत काय भूमिका मांडतात, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाने गोरेगाव येथे भव्य मेळाव्याची तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचे आवाहन इथून होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, मनोज जरांगे-पाटील यांचा नारायणगडावरील मेळावा यावरही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. मुंबई मोर्चानंतर आता जरांगे कोणती भूमिका जाहीर करणार, याकडेही लक्ष लागणार आहे. अशा पाच व्यासपीठांवरून राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींना दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.