रेल्वेचा प्रवास, रात्रीची वेळ अन् अचानक एका गर्भवतीला प्रसूतीकळा सुरू झाल्याने डब्यात घबराहट पसरली. मात्र, याच डब्यात प्रवास करणारे सायन हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत बोडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व परिस्थिती अतिशय संयमाने हाताळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी रेल्वेच्या धावत्या डब्यात मर्यादित साधनांमध्ये प्रचंड ताणतणावात महिलेची प्रसूती केली. त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला अन् नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
advertisement
सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये घडलेला हा प्रसंग केवळ वैद्यकीय नव्हे, तर माणुसकीचा जिवंत दाखला ठरला आहे. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अत्यंत संयमाने डॉक्टरांनी एक धाडसी निर्णय घेतला. आणि तो निर्णय म्हणजे, मर्यादित साधनांमध्ये दोन जिवांना वाचवून देवदूत ठरलेल्या डॉक्टरचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथील गर्भवती महिला दीक्षा बनसोडे सोलापूरहून ठाण्याला जाण्यासाठी एक्सप्रेसने निघाल्या होत्या.
कर्जत स्थानक सोडल्यानंतर अचानक त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे प्रवासीही घाबरले. मात्र, याच डब्यातून प्रवास करणारे डॉ. प्रशांत बोडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधला. नेरळ स्थानकात कर्तव्यावर असलेले रणजीत कुमार शर्मा यांनीही तत्काळ समन्वय साधला. ट्रेन कर्जत व नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान असताना न डगमगता इथेच प्रसूती करण्याचा धाडसी निर्णय डॉ. बोडगेंनी घेतला. या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
प्रसूतीनंतर आई आणि बाळ दोघांनाही नेरळ स्थानकात उतरवून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. दोघांचीही तब्येत सुखरूप असल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रसंगात डॉक्टरांची तत्परता, धैर्य आणि माणुसकी खऱ्या अर्थाने महत्त्वाची ठरली. आई आणि नवजात बाळावर नेरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर संगीता मेंढी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले. यानंतर महिलेला व बाळाला त्यांच्या कुटुंबासोबत ठाणे येथे पाठविण्यात आले.
