मंदिराच्या विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे मंदिर बन्सीलाल अग्रवाल आणि सुशीला बाई यांनी स्थापन केलं आहे. 1984 साली देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामानु संप्रदायाशी निगडित असलेल्या या मंदिराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या पवित्रतेसाठी काटेकोर नियम पाळले जातात. पुजारी वगळता कोणीही गर्भगृहात प्रवेश करू शकत नाही. महालक्ष्मी ही अग्रवाल कुटुंबाची कुलदेवी आहे. त्यामुळे त्यांनी या मंदिराची स्थापना केली.
advertisement
या मंदिरातील देवीला वर्षातून दोनदा दसरा आणि दिवाळीच्या वेळी 15 किलो सोन्याची साडी नेसवली जाते. भक्तांना याबाबत प्रचंड आकर्षण आहे. देवीला सोन्याच्या साडीत बघण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदिरात तीनही देवींच्या मूर्ती एकत्र असल्यामुळे भाविकांना एकाचवेळी त्रिदेवींचं दर्शन घडते. महाकाली शक्तीचं प्रतीक, महालक्ष्मी संपत्ती व समृद्धीचे प्रतीक आणि सरस्वती ज्ञानाचं प्रतिक मानलं जातं.
सध्या सुरू असलेल्या नवरात्रौत्सवात या मंदिरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ होणाऱ्या भजन-कीर्तनांमुळे वातावरण भक्तिमय झालं आहे. देवींच्या मूर्तींचा विशेष शृंगार, अभिषेक आणि आरतीचे सोहळे भाविकांच्या मनाला भावत आहेत.
विश्वस्त प्रवीण चोरबेले यांनी सांगितलं की, या नवरात्रौत्सवात विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी देखील काही सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यालाही हातभार लावला जात आहे. दरवर्षी नवरात्रीच्या काळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. पुण्याबरोबरच आसपासच्या जिल्ह्यांतूनही अनेक भक्त येतात.