खरीप पेरणीच्या वेळी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेर केली होती, मात्र खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवल्या नसल्याच्या तक्रारी देखील केल्या. मात्र रब्बी पेरणीला धाराशिव जिल्ह्यात थोडा बहुत पाऊस झाला, त्याच्या जोरावर शेतकऱ्यांनी हरभरा गहू या पिकाची पेर सुरू केली. मात्र गहू, हरभारा पेरला आणि त्याच्यासोबत खरीपातील सोयाबीनही रब्बी हंगामात उगवलं. या प्रकारमुळे शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. ठाराविक ठिकाणीच नाही तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा प्रकार घडला आहे.
advertisement
खरिपाच्या पेरणी वेळी धाराशिव जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेर झाली होती. पुरेसा पाऊस नसल्यानं निम्मही सोयाबीन यंदा शेतकऱ्याच्या पदरी पडलं नाही. त्यातच आता रब्बी पेरीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली व शेतकऱ्यांनी पेरलेल्या हरभरा, गहू या पिकांना जीवदान मिळालं. मात्र त्या पिकाबरोबरच आता रब्बीत पेरलेलं सोयाबीनही उगवल्याने शेतकऱ्याचा मशागतीचा खर्च वाढला आहे. गहू, हरभारा या पिकातून सोयाबीन उपटून टाकण्याच्या खर्चात वाढ झाली आहे.