धाराशिव : ना टाळ होती ना मृदंग, सोबत होती फक्त एक जुनी सायकल. परंतु उरी होती विठ्ठलभक्तीची ओढ. त्यामुळे सुरू केली वारी. आज पायी दिंडी सोहळा काढू शकू एवढ्या 7 ते 8 लाख रुपयांच्या वस्तू आहेत. ही कहाणी आहे एका विठ्ठलभक्ताची, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांची.
आजपासून 12 वर्षांपूर्वी त्यांनी 2 हजार रुपयांच्या सायकलला साउंड सिस्टम जोडून भजन म्हणत पंढरपूरची वारी सुरू केली. आता 600 वारकऱ्यांना सोबत घेऊन ते वारीला जातात.
advertisement
हेही वाचा : 'मानव सेवा हीच ईश्वरसेवा', या संस्थेकडून वारकऱ्यांचे पाय दिले जातात चोळून!
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कांबी येथील भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांनी वयाच्या 16व्या वर्षी विश्वासनंद महाराज यांची पालखी पंढरपूरला न्यायचं ठरवलं. अगदी त्यावेळेच्या लहान मुलांवर विश्वास ठेवून 60 वारकरी वारीसाठी तयार झाले. अनेक अडचणींवर मात करत ही पंढरपूरची वारी निघाली. आज त्यांच्या वारीत 600 वारकरी सहभागी होतात. कांबीपासून पंढरपूरपर्यंत 250 किलोमीटर अंतर श्री विठूरायाच्या दर्शनासाठी ते पार करतात. सोबत विश्वासनंद महाराज यांच्या पालखीचा रथ असतो.
अगदी टाळ गोळा करण्यापासून भाऊसाहेब पन्हाळकर यांनी संघर्ष केला. त्यानंतर लोकांना तयार करणं, त्यांना पंढरपूरपर्यंत घेऊन जाणं आणि वारी पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरहून सुखरूप घरपोच सोडणं, या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी दिंडी सुरू केली. आज 12 वर्षे ही वारी नित्यनियमानं सुरू आहे आणि पुढेही अशीच सुरू राहील, असं भाऊसाहेब पन्हाळकर यांनी सांगितलं.