धाराशिव : अनेकदा असं होतं की, ऐशोआरामचं आयुष्य असून, सगळ्या सुख-सुविधा जवळ असून आपल्याला मेहनत करायची नसते. तर दुसरीकडे मात्र नशिबानं परीक्षा बघितलेली असतानाही परिस्थितीशी दोन हात करून मातीतही हिरे चमकतात. कोरोना काळात अनेकजणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवलं. तिनंसुद्धा तिच्या वडिलांना डोळ्यांदेखत जाताना पाहिलं. वडिलांचीच इच्छा होती तिनं नृत्यक्षेत्रात खूप मोठं नाव कमवावं, टीव्ही शोमध्ये दिसावं. हीच जिद्द उराशी बाळगून तिनं आपली कला साता समुद्रापार नेली.
advertisement
ही यशोगाथा आहे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील पाथरूड इथं राहणाऱ्या स्नेहा दुधाळ हिची. विशेष म्हणजे कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना ती प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फिटतील एवढं सुंदर नृत्य सादर करते. ती युट्यूब व्हिडीओ पाहून डान्स शिकली.
हेही वाचा : लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिनं हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग, सोलापूरकर लय भारी!
उत्तर प्रदेशच्या अयोध्येत झालेल्या ऑल इंडिया नॅशनल डान्स कॉम्पिटिशनमध्ये एकूण 13 राज्यातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या सर्व 600 स्पर्धकांना मागे टाकत स्नेहानं पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे तिनं सिंगापूर, थायलंड या देशांमध्ये जाऊनही नृत्य स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. कौतुकास्पद बाब अशी की, स्नेहा ही केवळ कलेतच नाही, तर अभ्यासातही तेवढीच हुशार आहे. यंदा तिनं बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला तब्बल 80 टक्के गुण मिळाले.
दरम्यान, अनेकदा परिस्थितीपुढं हार मानून कला मागे पडते. परंतु स्नेहानं आर्थिक अडचणींवर मात करत आपली कला जपलीये. त्यात तिच्या कुटुंबियांनीही तिला खंबीर पाठिंबा दिला. परंतु परिस्थितीमुळं तिला काही स्पर्धांना जाणं शक्यच होत नाही. स्नेहासारख्या अशा सर्व स्पर्धकांच्या पाठीशी सरकारनं उभं राहायला हवं, शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्नेहाला मदत करावी, अशी अपेक्षा तिच्या आईनं व्यक्त केलीये.