धाराशिव: श्री क्षेत्र सोनारी हे काळभैरवनाथाचे देवस्थान देशभरात प्रसिद्ध आहे. अनेकांचे कुलदैवत असलेल्या धाराशिवमधील श्रीक्षेत्र काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. याच सोनारी गावात दोन ते अडीच हजार माकडे आहेत. याठिकाणी आठ दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. पिलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच आईचा मृत्यू झाला. तशा अवस्थेत माकडाचं पिलू आईला बिलगत होतं. हे पाहून सचिन सोनारीकर यांनी त्या पिलाला घरी आणले आणि आता ते त्याचा सांभाळ करत आहेत. आतापर्यंत त्यांनी संकटातील माकडांचा आधार बनण्याचं काम केल्यानं त्यांचं कौतुक होतंय.
advertisement
नेमकं घडलं काय?
आठ दिवसांपूर्वी सायंकाळच्या 9 वाजता एका माकडीनीच्या पिलाचा जन्म झाला. पिलाला जन्म देतातच आईचा अवघ्या काही मिनिटात मृत्य झाला. लहान असलेलं ते माकडाचं पिल्लू भूक लागली म्हणून आईच्या कुशीत शिरत होतं. तर जिवंत नसलेली आई त्या पिलाला प्रतिसाद देत नव्हती. भुकेने व्याकुळ झालेलं माकडीनीचे पिल्लू मोठमोठ्याने आक्रंदत होतं. जवळून चाललेल्या सचिन सोनारीकर यांना माकडाच्या पिलाचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिलं तर नुकताच जन्म झालेलं एक लहान पिलू दिसलं. आई सोडून गेल्याने ते जीवाच्या आकांताने ओरडत होतं.
निळ्या पाण्याची गोष्ट! वीज पडल्याची अफवा अन् Viral Video मागील सत्य
पिलाला घरी आणलं
सचिन सोनारीकर यांनी त्या लहान पिलाला ताब्यात घेतलं. घरी आणून दूध पाजलं, स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं. त्याला अंघोळ घातली आणि आज त्या पिलाचा ते सांभाळ करतायेत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर दरवाज्या बाहेरचे 200 माकडं त्यांची वाट पाहत असतात. कारण दररोज सकाळी ते माकडांना अन्न पुरवतात, असं सचिन यांनी सांगितलं.
माकडांचं स्वीकारलं पालकत्व
सचिन सोनारीकर यांनी माकडांचं पालकत्व स्वीकारलंय. माकडांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आत्तापर्यंत त्यांनी 20 ते 25 अशा लहान पिलांना सांभाळले आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलंय. गेल्या आठ दिवसांपूर्वी सापडलेलं हे पिलू आता ठीकठाक आहे. दीड ते दोन महिन्यानंतर पूर्ण स्वावलंबी झाल्यानंतरच या पिलाला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार असल्याचं सचिन सोनारीकर यांनी सांगितलं.