धाराशिव : अनेकदा व्यक्ती कर्जबाजारी होतो. मात्र, त्यातूनही अनेक जण मार्ग काढतात. आपल्या आवडीचा व्यवसाय सुरू करतात. त्यात मेहनत करतात आणि जिद्दाने त्यात यशस्वी होतात आणि आपल्या परिस्थितीवर मात करतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी -
दुष्काळी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातल्या निपाणी येथील राजशेखर पाटील यांची ही 2003 मधील घटना आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या राजशेखर पाटील यांनी शेती करण्याचा ठरवलं. त्यांनी बीएस्सीचे शिक्षण घेतले. पण शेती करण्याचे ठरवल्यावर त्यांच्या डोक्यावर दहा लाखांचं कर्ज होतं. त्यामुळे शेती कशाची करावी, हेच त्यांना समजत नव्हते. मात्र, त्यांनी त्यातूनही मार्ग काढला आणि बांबु शेती करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
बांबू शेतीचे महत्त्व ओळखत त्यांनी 21 वर्षांपूर्वी शेतीच्या बांधावर 40 हजार रोपांची लागवड केली आणि तीन वर्षानंतर त्यांना 20 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी शेतात बांबू लागवडीला सुरुवात केली. आपल्या शेतात त्यांनी 100 विविध जातींच्या बांबूची लागवड केली आहे. आता त्यांची 54 एकर बांबूची शेती आहे. तर त्यांच्याकडे आता 1 कोटी बांबू आहेत.
राजशेखर पाटील यांच्याकडे बांबूच्या रोपांची मागणी होऊ लागली. त्यामुळे त्यानंतर त्यांनी रोपवाटिकेला सुरुवात केली. वर्षाकाठी 5 ते 10 लाख रोपांची ते विक्री करतात आणि देशभरातून त्यांच्या रोपांना मागणी असते. एकेकाळी कर्जबाजारी असलेले राजशेखर पाटील आता कोट्याधीश झाले आहे.
त्यांनी शेतात पाच फुटांवर बांबूची लागवड केली आहे. अशाप्रकारे त्यांनी एकरी 1 हजार रोपांची लागवड केली आहे आणि त्यातून त्यांची करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. राजेश शेखर पाटील यांचा दूरदृष्टीपणा आणि यशस्वी बांबू शेतीमुळे त्यांना भारत सरकार, महाराष्ट्र शासन, त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांचे त्यांना 40 हुन अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राजशेखर पाटील यांनी केलेली बांबूची शेती ही अनेकांना प्रेरणादायी आहे.