धाराशिव : आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी श्री विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत पंढरपूरकडे निघाले आहेत. अनेक पालख्या हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपूरकडे निघाले आहेत. या वारी दरम्यान, अनेकजण समाजापयोगी उपक्रम राबवत असतात. यातच आता ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केलेले हरिश्चंद्र वडगणे हेसुद्धा वारकऱ्यांची सेवा करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील खडका मडका येथील हरिश्चंद्र भडगणे यांनी ट्रक ड्रायव्हर म्हणून अनेक वर्ष काम केलं. काही वर्ष ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केल्यानंतर जवळच्या पैशातून त्यांनी स्वतःचा ट्रक विकत घेतला आणि त्यानंतर पाण्याची टाकी विकत घेतली. सध्या ते त्यांचा ट्रक ऊस वाहतुकीसाठी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
advertisement
रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी। देह दंग सावळ्याच्या अंगणी।। पहिलं रिंगण संपन्न
यातच आता हरिश्चंद्र भडगणे श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखीसोबत वारकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी स्वतःचा ट्रक आणि टाकी घेऊन वारीत आले आहेत. वारीत ते मोफत पाणी वाटप करत आहेत, त्यामुळे वारकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची, अंघोळीच्या पाण्याची सोय होत आहे.
पांडुरंगाच्या वारीतही योगा, यातून भक्तीचा मार्ग सुखकर..., वारकऱ्यांनी व्यक्त केल्या 'या' भावना
वारकऱ्यांना अंघोळ करता यावी, यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाच्या तोट्या बसवल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही तर एकाच वेळी अनेक वारकऱ्यांना आंघोळ करता येते आणि पाणी घेता येते. श्री संत एकनाथ महाराजांची पालखी पैठण ते पंढरपूर असा प्रवास करते आणि पैठण पासून वडगणे हे पालखीसोबत पंढरपूर पर्यंत येतात आणि मोफत पाणी वाटपाचं काम करतात.
मागील तीन वर्षांपासून मी सातत्याने श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात मोफत पाणी वाटपाचे काम करीत आहे. पुढील अनेक वर्ष ही सेवा अशीच चालू राहील, अशी प्रतिक्रिया हरिश्चंद्र वडगणे यांनी लोकल18 शी बोलताना दिली.