धाराशिव : आषाढी वारीनिमित्त श्री संत एकनाथ महाराज यांची पालखी दरवर्षी पैठण ते पंढरपूर असा प्रवास करते. पालखीसोबत जवळपास 30 हजार वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या मार्गात धाराशिव जिल्ह्यात पालखीनं प्रवेश केल्यानंतर दीड किलोमीटरचा प्रवास हा अतिशय खडतर आहे. इथं अक्षरशः ट्रॅक्टरमधून पालखी आणावी लागली. कारण या मार्गावर पालखीचा रथ चालतच नाही.
advertisement
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाची घोषणा केली होती. या मार्गाचं कामदेखील सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील पालखी मार्गाचं काम लवकरात लवकर करावं, वारकऱ्यांची गैरसोय टाळावी, तसंच श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीसाठी दीड किलोमीटर रस्त्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जातेय.
हेही वाचा : वारकऱ्यांसाठी खुशखबर! आता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचं दर्शन घेता येईल 24 तास
धाराशिव जिल्ह्यात पालखीनं प्रवेश केल्यानंतर दीड किलोमीटर रस्ता हा बैलगाडी वाट रस्ता आहे. इथं पावसाळ्यात चिखल होतो, त्यामुळे बैलगाडीसुद्धा चालत नाही. अशावेळी पालखीचा प्रवास हा ट्रॅक्टरमधून होतो आणि वारकऱ्यांना याच चिखलातून खडतर मार्गानं जावं लागतं. त्यामुळे या रस्त्याचं काम करावं, अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली.
दरम्यान, आषाढी वारीमध्ये दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी होतात. ऊन असो, वारा असो, पाऊस असो वारकरी मोठ्या उत्साहानं आणि विठ्ठलभेटीच्या आतुरतेनं श्री संत महाराजांच्या पालख्यांसंगे पंढरपूरच्या वाटेवरून पायी प्रवास करत असतात. या आषाढी वारीची ते वर्षभर वाट पाहतात.