ही घटना धुळे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात घडली होती. तीन संशयित दुचाकीवरून आले आणि त्यांनी हवेत तीन गोळ्या झाडून एका सराफा व्यापाऱ्याच्या हातातील साडेतीन किलो सोन्याची बॅग हिसकावून घेतली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, ज्यामुळे आरोपींचा माग काढणे सोपे झाले.
advertisement
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी उत्तर प्रदेशमधील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, एलसीबीच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि सुमारे साडेतीनशे ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी आंतरराज्य गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या सशस्त्र दरोड्यामध्ये आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरातील सराफा व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असताना ओळख पटलेले हे सर्व आरोपी मुंबईत ओला उबेर कंपनीत टॅक्सी चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आला आहे. दरोड्याच्या घटनेनंतर हे सर्वजण प्रतापगड येथे पळून गेले होते. पण पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.