साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी जास्त गर्दी केली नाही. नवरात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू होता. या पाऊसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर येऊन पडले. अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी उघड्यावर पडल्या, अनेकांचे अख्खे संसार पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीमुळे अनेक भाविकांना तुळजापूर गाठता आले नाही. शिवाय, पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांना देवीला देणगी देता आली नाही. यासोबतच देणगी दर्शनाच्या वाढलेल्या दरांमुळे यंदा तुळजाभवानी देवस्थानच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत 34 लाखांहून अधिकची घट झाली आहे.
advertisement
दरवर्षी नवरात्री ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साधारणतः 70 लाखांहून अधिक भाविकांची मंदिरात हजेरी लागते. गेल्या वर्षीच्या नवरात्री ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवाच्या काळात 15 दिवसात 6 कोटी 1 लाख 42 हजार रूपयांचे उत्पन्न देवस्थानाला मिळाले होते. यंदा हाच उत्सव कालावधी 17 दिवसांचा असतानाही 5 कोटी 66 लाख 94 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने यंदा पेड दर्शनाचे दर वाढविण्यात आले होते. 200 रूपयांचा पास 300 रुपये, 500 रुपयांचा 1 हजार रुपये, रेफरल पास 200 रुपयांचे 500 रुपयांना करण्यात आले होते. यामुळे दर्शनातून मिळणाऱ्या देणगीच्या उत्पन्नामध्ये जवळपास 41 लाखांनी कमी झाली आहे.
गेल्या वर्षी देणगी दर्शनातून 2 कोटी 71 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी हेच उत्पन्न 2 कोटी 30 लाखांवर आले आहे. देणगी दर्शन पाससाठी यंदा कॅशसह यूपीआय आणि ऑनलाइन प्रणालीचा वापरही वाढला. यावर्षी भाविकांनी गुप्तदानामध्ये 20 लाख 93 हजार रूपये देवस्थानाला दान केले आहे. तर, बंद झालेला लाडूचा प्रसाद यंदापासून पुन्हा सुरू करण्यात आला असून, लाडूपोटी 11 लाख 92 हजार रूपयांचे उत्पन्न देवस्थानला प्राप्त झाले.