डॉ. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार आहेत. लोकसभेत डॉ. कोल्हे आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतात. मात्र, आता त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका त्यांना अडचणीची ठरू लागली आहे. 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याला त्यांच्या भूमिकांचा फटका बसू लागला आहे.
या महानाट्याचे नाशिकमध्ये होणारे सगळे शो रद्द करण्याची वेळ अमोल कोल्हे यांच्यावर आली आहे. अमोल कोल्हे यांनी वक्फ विधेयक आणि पेहलगाम हल्ल्यात केलेल्या पोस्टमुळे नाटकाला प्रतिसाद मिळू न शकल्याने आयोजकांनी हा शो रद्द केल्याच सांगितलं. तर कोल्हे यांनी या सगळ्या प्रकरणावर खंत व्यक्ती केली आहे.
advertisement
डॉ. अमोल कोल्हे यांनी काय म्हटले?
कलाकार आणि राजकीय भूमिका यांचा संबंध जोडण्याची गरज नाही. दोन स्वतंत्र गोष्टी म्हणून त्याकडे पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत आपली भूमिका स्पष्ट असून ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे, या भूमिकेतून संपूर्ण देश पंतप्रधानांच्या पाठिशी उभा असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. राजकीय जोडे घालून महानाट्य करत नाही. महानाट्याचे तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांची कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, शिवपुत्र संभाजी महानाट्याची आम्ही दीड महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियात घेतलेल्या भूमिकेमुळे आम्ही व्यथित झालो. त्यामुळेच नाइलाजाने हे प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयोजक गोपाळ पाटील यांनी सांगितले.