रत्नागिरी : राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. ठिकठिकाणी झाडं आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहे. मागील अनेक वर्षांपासून संथ गतीने काम सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्ग अखेर बंद करण्याची वेळ आली आहे. संगमेश्वर शास्त्रीपुल इथं दरड कोसळल्याने महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या कामामुळे झालेल्या डोंगरकटाईचा परिणाम पावसाळी वाहतुकीवर होताना दिसत आहे. महामार्गावर होणारे वारंवार अपघात आणि महामार्ग प्राधिकरणाचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष आणि निकृष्ट प्रतीचे ठेकेदाराचे काम यामुळे सर्वसाधारण माणसाला त्याचा फटका बसताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी संगमेश्वर येथे तीन दुचाकी मातीच्या ढिगार्याखाली गाडल्या गेल्या होत्या. आता संगमेश्वर शास्त्रीपुल येथे दरड कोसळल्याने महामार्ग बंद करावा लागला आहे. दरड कोसळून महामार्ग बंद होण्याची ही तिसरी वेळ आहे.
advertisement
धीम्या गतीने सुरू आहे काम, गावकऱ्यांनी केलं होतं आंदोलन
दरडीच्यावरील जमिनीला तडे गेल्याने तीन घरांना धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शास्त्रीपूलाजवळ रिक्षावर दरड कोसळल्याने ग्रामस्थानी महामार्ग रोखून धरला होता. तत्कालीन डी, वाय, एस पी, पारवे यांच्या मध्यस्थीने आणि महामार्गच्या ठेकेदाराने या ठिकाणी 15 दिवसांच्या आत संरक्षण भिंत बांधून देण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे त्या संरक्षण भिंतीचे कामही सुरू झाले मात्र ते काम अत्यंत धिमी गतीने सुरू असून आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा दरड कोसळली आहे.
अनेक घरांना धोका
तसंच या दरडीच्या वरती कादिर इस्माईल दळवी, बेगम लतीफ दळवी, निझम इस्माईल दळवी, इफतिकार लतीफ दळवी यांची राहती घरं असून या घराच्या समोरील जमिनीला तडे गेल्याने या घरांना देखील धोका निर्माण झाला आहे. महामार्गच्या ठेकेदारच्या आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जिवीतहानीची शक्यता निर्माण झाल्याने एखाद्याचा बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे का? असा सवाल येथील ग्रामस्थ आणि प्रवाशी विचारत आहेत. दरम्यान, संगमेश्वर येथील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.