एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यावरही याचे परिणाम दिसून आले. दोन्ही शिवसेनेचे मेळावे पार पडत आहेत. ठाकरे गटाचा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क येथे पार पडत असताना दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा नेस्को ग्राउंडमध्ये पार पाडणार आहेत. त्याआधी दोन्ही पक्षांकडून दसरा मेळाव्याची वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. बॅनर, होर्डिंगसह सोशल मीडियावर टीझरही प्रसारीत केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज दुसरा टीझर लाँच करण्यात आला.
advertisement
ठाकरे ब्रँडची धास्ती की नवी स्ट्रॅटजी?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याच निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे निवडणूक ठाकरे ब्रँड भोवती केंद्रीत होण्याची शक्यता आहे. याच ठाकरे ब्रँडला शिंदे गटाकडून आव्हान दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर लाँच केला. या टीझरमध्ये दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार...हिंदुत्वाचा हुंकार...स्वाभिमानी वादळ...वाघाची भगवी डरकाळी असे भाष्य करण्यात आले. त्यापुढेही 'महाराष्ट्रामध्ये ब्रँड एकच शिवसैनिक...', बाळासाहेबांचे भगवं स्वप्न शिवसैनिकच पूर्ण करणार असेही टीझरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाने आता थेट ठाकरे ब्रँडला चॅलेंज केले असल्याची चर्चा रंगली आहे.
ठाकरे ब्रँडचा मुद्दा मुंबईसह इतर काही महापालिकांमध्ये महत्त्वाचा राहणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबईसह इतर काही ठिकाणी एकनाथ शिंदेंना त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाने थेट ठाकरे ब्रँडलाच आव्हान दिले आहे. टीझरमध्ये शिवसैनिकांचा उल्लेख करत आपल्या दाव्याला भावनिक किनारही शिंदे गटाने दिली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.