फक्त महाराष्ट्रातच नाही, तर उत्तराखंड, जम्मू-कश्मीरसह उत्तर भारतातील राज्यांतही ढगफुटीसारख्या घटनांनी परिस्थिती गंभीर झाली. पंजाबमध्ये दशकामधला सर्वात मोठा पूर आला, तर हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये रस्ते-पूल कोसळले. यामुळे ऑगस्ट महिन्याला देशभरात अतिवृष्टीचा महिना म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतात ऑगस्ट महिन्यात 2001 नंतरची सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद झाली असून सरासरी 265 मिमी पाऊस झाला. यामुळे गेल्या 124 वर्षांतील हा 13वा सर्वाधिक पावसाचा ऑगस्ट महिना ठरला आहे. देशभरात ऑगस्ट महिन्यात एकूण 268.1 मिमी पाऊस झाला, जो सामान्यपेक्षा 5% अधिक आहे.
advertisement
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत देशात एकूण 743.1 मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा 6% जास्त आहे. विशेष म्हणजे, दक्षिण प्रायद्वीपीय भारतात ऑगस्ट महिन्यात 250.6 मिमी पाऊस झाला, जो सामान्यपेक्षा तब्बल 31% जास्त असून हा 2001 नंतरचा तिसरा सर्वाधिक पावसाचा ऑगस्ट महिना ठरला.
सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रासाठी काय अंदाज?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर 2025 मध्ये देशभरात मासिक पावसाचं प्रमाण सामान्यपेक्षा जास्त (109% पेक्षा अधिक) राहण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहील, मात्र ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये पाऊस तुलनेने कमी राहू शकतो.
IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी उत्तराखंडमध्ये सप्टेंबरमध्येही भूस्खलन आणि फ्लॅश फ्लडची शक्यता व्यक्त केली आहे. याचा परिणाम दिल्ली, दक्षिण हरियाणा आणि उत्तर राजस्थानसारख्या निचांकी भागांवर होऊ शकतो. महाराष्ट्र-गोवा आणि गुजरातमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज. विशेषतः 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर वाढेल. गणपती विसर्जनाच्या काळात (3 ते 6 सप्टेंबर) जोरदार पावसामुळे विसर्जनाची तयारी आव्हानात्मक होऊ शकते.
गुजरातमध्ये 4-5 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस राहील. 5-6 सप्टेंबर रोजी सौराष्ट्र-कच्छ भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येऊ शकतो. ऑगस्ट महिन्यात नांदेड, कोकण आणि विदर्भातील ढगफुटीसदृश्य पावसाने मोठं नुकसान केलं. शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं, तर शहरी भागात पाण्याखालील रस्त्यांमुळे वाहतूक विस्कळीत झाली. आता सप्टेंबरमधील अंदाज पाहता, राज्य प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पावसाचा इशारा अत्यंत महत्त्वाचा ठरतोय.