ठाकरे गटाच्या डोक्यात हवा गेलीये, राष्ट्रवादीची टीका
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची बैठक फिस्कटल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडत ठाकरे गटाच्या डोक्यात हवा गेल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
सक्षम उमेदवार असतील तर दोन पाऊल मागे या, ठाकरे गटाची सूचना
advertisement
यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीवर आडमुठे धोरण स्वीकारल्याची टीका केली. बैठकीतून बाहेर जाण्यास कोणीही सांगितले नव्हते, ते स्वतःहूनच निघून गेल्याचा दावाही ठाकरे गटाने केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार असतील तर दोन पाऊल मागे सरकून चर्चेचे दरवाजे खुले ठेवण्याची तयारी असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही पक्षाचा आत्मसन्मान राखून आघाडीच्या जागावाटपाची चर्चा व्हावी
आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिसाद येतो, यावर जळगाव महापालिकेतील महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येणार की नाही? हे अवलंबून असणार आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अजूनही युतीची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र दोन्ही पक्षाचा आत्मसन्मान राखून आघाडीच्या जागावाटपाची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा
बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
