विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री छापेमारी करत ही मोठी कारवाई केली. हा छापा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (एएचटीयू) पथकाने टाकला. छापेमारीत पोलिसांनी तीन बांगलादेशी महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल तारा येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून घटनेची शाहनिशा केली. त्याअनुषंगाने सापळा रचला. बनावट ग्राहकाने देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांना सिग्नल दिला. त्यानंतर पोलिसांच्या टीमने हॉटेलवर छापा टाकत आरोपींना रंगेहाथ पकडलं. या कारवाईत हॉटेल मालक योगेश देवरे, दोन कर्मचारी आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या महिलांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पत्त्याचे आधार कार्ड सापडले. मात्र, त्या महिलांना मराठी किंवा हिंदी भाषा येत नसल्याचं समोर आलं आहे. इतकेच काय तर त्यांना भारताचे राष्ट्रगीतही म्हणता आलं नाही. त्यामुळे त्या बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील अशाप्रकारे बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. बांगलादेशी महिलांना जास्तीच्या पैशांचं किंवा नोकरीचं आमिष दाखवून भारतात आणायचं आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घ्यायचा, ही मोडस ऑपरेंडी आरोपींची असल्याचं विविध घटनांमधून समोर आलं आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.