जालना : जून महिना सुरू झाल्यावर आता पांडुरंगाच्या वारीचे वेध लागले आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे भरणारी विठुरायाची यात्रा महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. येत्या काहीच दिवसांमध्ये देहू येथून संत तुकोबारायांची तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूर साठी रवाना होणार आहे.
राज्यभरातील लाखो वारकरी आषाढी यात्रेसाठी पायी वारीमध्ये सहभागी होतील. जे वारकरी या पायी वारीत सहभागी होऊ शकणार नाही त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच बसेसची व्यवस्था केली आहे. जालना जिल्ह्यातून तब्बल 200 बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार आहेत. तर प्रत्येक गावातून बस सोडण्याचे देखील एसटी महामंडळाचे नियोजन आहे.
advertisement
येत्या 17 जुलै रोजी राज्यातील सगळ्यात मोठा उत्सव म्हणजेच आषाढी एकादशी आहे. यादिवशी पंढरपूर येथे हजारो वैष्णवांचा मेळा जमून आपल्या आराध्य विठुरायाला नमन करतात. तत्पूर्वी आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबारायांची पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ होतील. हा सुखसोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य वारकरी पायी दिंडीत सहभागी होतात. मात्र, अनेकांना पायी दिंडीत सहभागी होणे शक्य नसतं. अशा लोकांच्या सेवेसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुविधा पुरवली जाते.
यंदा जालना आगारातून 180 ते 200 बसेस पंढरपूरसाठी सोडण्याचे जालना विभागाचे नियोजन आहे, असं जालन्याचे आगारप्रमुख अजिंक्य जैवल यांनी सांगितले. तर जालना आगारातून 30 ते 40 बसेस सोडण्यात येतील. याबरोबरच ज्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविक पंढरपूरसाठी जाणार असतील, त्यांनी एसटी महामंडळाकडे अर्ज करावा. त्या गावातून पंढरपूरला जाण्यासाठी बसची योग्य सोय जालना विभागाच्या वतीने करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
साधारणतः 12 जुलैपासून पंढरपूरसाठी बसेस सुरू होतील. यासाठी सकाळी 5 वाजेची वेळ ठरवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीनुसार वेळेमध्ये बदल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मागील वर्षी 90 लाखांचा महसूल -
पंढरपूरसाठी दरवर्षी एसटी महामंडळ विशेष गाड्यांचे नियोजन करत असते. तसेच नियोजन यंदाही करण्यात आले आहे. यामध्ये आणखी एक भर म्हणून गावागावातून एसटी बस पंढरपूरसाठी रवाना करण्याचाही एसटी महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे. गतवर्षी पंढरपूर वारीमधून एसटी महामंडळाच्या जालना विभागाला तब्बल 90 लाखांचा महसूल मिळाला होता. यामध्ये यावर्षी आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे.