पिंपळगाव शेरमुलकी येथील नदीवर पूल असून या पुलावर वर्षानुवर्षे खड्डे पडलेले होते. पावसाळ्यात पाणी आल्यावर हे खड्डे पूर्णपणे लपत असल्याने वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत होती. अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते आणि कधी तरी मोठा अपघात होऊन कोणाचा तरी जीव जाईल, अशी भीती ग्रामस्थांना सतावत होती.
मुंबई-गोवा महामार्गावर वाढले अपघात, इंजिनिअर तरुणानं केलं असं, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा, Video
advertisement
या पुलावरूनच श्री क्षेत्र राजूर गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा मुख्य मार्ग जातो. तरीही अनेक वर्षे हा रस्ता दुरुस्त करण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. भोकरदन आणि बदनापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतून आणि खासदारांच्या क्षेत्रातूनही या गावाला फायदा झाला नाही. ग्रामस्थांनी अनेकदा लेखी निवेदने दिली, आश्वासने घेतली, पण प्रत्यक्ष काम काहीच झाले नाही.
शेवटी गावातील तरुण शेतकरी रामदास गाडेकर यांनी धैर्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आईचे आणि पत्नीचे मौल्यवान दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेल्या पैशाने सिमेंट-खडी विकत घेऊन पुलावरील धोकादायक खड्डे स्वतः बुजवायला सुरुवात केली. "अपघातात कोणाचा जीव जाण्यापेक्षा आईचे दागिने मोडले तरी चालतील, पण रस्ता सुरक्षित हवा," असे भावनिक शब्द रामदास यांनी बोलून दाखवले.
रामदास यांच्या या पावलाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली. चंदर गटकाळ, प्रकाश खरात, प्रभाकर गटकाळ, अवचित गाडेकर, राजू गाडेकर, पंढरीनाथ गटकाळ, रमेश गाडेकर, आकाश गाडेकर, प्रभु देवा, दत्तू गाडेकर, लक्ष्मण गाडेकर यांसारख्या अनेकांनी हातभार लावला आणि कामाला गती दिली.
आता गावकऱ्यांचा संताप कमालीचा वाढला आहे. उर्वरित रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. एका शेतकऱ्याने आपल्या कुटुंबीयांचे दागिने गहाण ठेवून गावासाठी केलेला हा त्याग खरोखरच मनाला भिडणारा आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले तरच अशा परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाहीत, हे नक्की!






