अजितदादांचं निधन! महाराष्ट्रातील ‘या’ बाजार समितीत गुरुवारी लिलाव बंद, पाहा सविस्तर
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
APMC Market: राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्री आणि लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे बुधवार (दि. 28) रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार (दि. 29) रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्री आणि लिलाव प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे बाजार समितीचे मुख्य व उपबाजार बंद
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला विभाग, पान बाजार, केळी बाजार, गुरांचा बाजार, गुळभुसार बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र आणि पेट्रोल पंप विभाग गुरुवारी बंद राहणार आहेत. तसेच मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारही पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.
advertisement
अहिल्यानगरमधील कांदा व भुसार लिलाव स्थगित
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेले भुसार विभाग, भाजीपाला विभाग, कडबा विभाग तसेच नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव गुरुवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार बंद
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या मुख्य उपबाजार आवारातील कांदा व धान्य लिलाव, तसेच विंचूर उपबाजारातील सर्व प्रकारच्या शेतीमालाचे लिलाव गुरुवारी होणार नाहीत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे.
जालन्यात भुसार, किराणा मार्केट बंद
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील किराणा आणि भुसार मार्केटचे व्यवहार गुरुवारी बंद राहणार आहेत. याबाबत जालना आडतिया असोसिएशन व व्यापारी महासंघाने बाजार समितीला पत्र दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकरिता आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे यांनी केले आहे.
advertisement
शेतकऱ्यांना शेतीमाल न आणण्याचे आवाहन
गुरुवारी राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया स्थगित राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, अशा स्पष्ट सूचना संबंधित बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. पुढील निर्णय बाजार समितीमार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 10:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांचं निधन! महाराष्ट्रातील ‘या’ बाजार समितीत गुरुवारी लिलाव बंद, पाहा सविस्तर










