जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी 2018 पासून देण्यात आली होती. जवळपास सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकरत होते. 9 जानेवारी 2025 रोजी जयंत पाटील यांनी थोडे दिवस थांबा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा मला या जबाबदारीतून मोकळं करा म्हणत राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत.
advertisement
जयंत पाटील यांनी काय म्हटले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या वाटचालीवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विविध आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या भाषणाचा समारोप करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, शरद पवारांनी मला संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून 7 वर्ष राहिलो, जबाबदारी सांभाळली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यांनी असे वक्तव्य करताच सभेत घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार आपले नेते असून अंतिम निर्णय ते घेतील असे म्हटले.
आजच्या भाषणातून जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केल्याने खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची मागणी त्यांनी याआधीदेखील केली होती.