याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पकडलेल्या 4 आरोपींकडून 39 लाखाहून अधिकचा ऐवज आणि गाडी जप्त केली आहे. विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय 24 वर्षे), सोनूसिंग जितेंद्रसिंग जुन्नी (वय 27 वर्षे), सन्नी करतारसिंग सरदार (वय 27 वर्षे), अतुल सुरेश खंडाळे, अशी आरोपींची नावं आहेत. या आरोपींच्या चौकशीत ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध 40 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
advertisement
गेल्या वर्षभरात ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली होती. गुन्हे शाखेचं कल्याण युनिट या गुन्ह्यांचा समांतर तपास करत होतं. आरोपीं पकडण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या शिकलकर टोळीतील सदस्यांवर पोलिसांचं विशेष लक्ष होतं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाला आरोपींना अटक करण्यात यश आलं.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत, गुन्ह्यात वापरलेली गाडी, सोने-चांदीचे दागिने आणि पैसे असा एकूण 39 लाख 53 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चारपैकी तीन आरोपी पुण्यातील हडपसर येथील रामटेकडी परिसरात तर अन्य एक आरोपी कल्याण परिसरात राहतो. दोन आरोपी पोलीस कोठडीत तर अन्य दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.