छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरने पाच दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर व्हीसीद्वारे कोर्टात हजर
त्याचे वकील सौरभ घाग यांनी कोरटकरला एकदा तीन दिवस आणि नंतर दोन अशी पाच दिवस दिलेली कोठडी पुरेशी असल्याचे न्यायालयासमोर मांडले. गेल्या दोन वेळचा अनुभव पाहता आज त्याला सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाइन व्हीसीद्वारे कोर्टात हजर केले होते.
advertisement
दाढी वाढलेला कोरटकर कोर्टासमोर हात जोडून उभा होता. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला. त्याने तात्काळ वकिलांच्या माध्यमांतून जामीनसाठी अर्ज केला. मात्र हा अर्ज कोर्टाने स्वीकारत त्यावर एक एप्रिलला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे आता त्याचा मुक्काम कळंबा जेलमध्ये असणार आहे.
कोरटकरने वापरलेली मर्सिडीज कार पोलिसांनी जप्त केली
त्याच्या वकिलानी केलेल्या मागणीनुसार त्याला कळंबा जेलमध्ये सुरक्षित ठेवण्याच्या सूचना पोलिसांना कोर्टाने दिल्या. त्यामुळे जेलमध्ये सुद्धा त्याला भीती वाटत आहे का? असे कोल्हापूरकर विचारत आहेत. दरम्यान कोरटकरने वापरलेली मर्सिडीज कार पोलिसांनी जप्त केली आहे. यापूर्वीही त्याची एक गाडी जप्त करण्यात आली होती.
कोरटकरला शिवरायांचा अवमान करणे आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणे चांगलेच भोवल्याचे दिसत आहे. जवळपास पाच ते सहा दिवस त्याला जेलची हवा खावी लागली.
कोरटकरने त्या ५ मित्रांची अडचण वाढवली
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादीच पोलिसांनी न्यायालयाला दिली. त्यामुळे त्याच्या मित्रांच्या अडचणीत वाढ झालीय. नागपूरचा प्रशिक पडवेकर, चंद्रपुरचा धीरज चौधरी, इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी, तेलंगणा मधील करिमनगरचा साईराज शेटकर अशा पाच मित्रांनी फरार काळात कोरटकरला मदत केली. या मित्रांच्या मदतीने कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता.