पूर्वी कोल्हापूर शहर हे छोट्या खेड्याच्या स्वरूपाचे होते. तेव्हा बाजूने तटबंदी होती. या तटबंदीला लागूनच असलेल्या एके ठिकाणी अनेक पैलवान व्यायामासाठी यायचे. तेव्हापासूनच इथे 1880 साली तटाकडील तालीम उदयास आली. त्यामुळे या मंडळाचा जवळपास 142 वर्षांचा इतिहास असून यंदाचा हा मंडळाचा 143 वा गणेशोत्सव आहे, अशी माहिती मंडळाचे सदस्य शहाजी शिंदे यांनी दिली आहे.
advertisement
गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा शूभ मुहूर्त कोणता? पाहा काय आहे योग्य पद्धत
गेल्या कित्येक वर्षांपासून या मंडळाने अनेक परंपरा जपलेल्या आहेत. कोल्हापुरात सर्वप्रथम गणपती विसर्जन मिरवणुकीत गणेश मूर्तीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी या मंडळाने केली होती. तर कोल्हापुरात मिरवणुकीत सर्वप्रथम झांजपथक आणणे, नामांकित बंजे आणणे अशा गोष्टी देखील मंडळाने केलेल्या आहेत.
पारंपरिक पद्धतीने आणि साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणे, कोल्हापूरकरांसाठी दरवेळी काहीतरी नाविन्य आपल्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी आणणे, अशा परंपरा या मंडळाने जपलेल्या आहेत. कोरोनानंतर मंडळाची विसर्जन मिरवणुकीतील परंपरा खंडित झालेली पाहायला मिळाली. यंदा देखील मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीतील नृत्यांच्या ऐवजी भव्य असा कृत्रिम राजदरबार उभारण्यात येणार आहे. या राजदरबारात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
बालगणेश अन् बाळू मामा.. 'या' मूर्तींना आहे कोल्हापूरकरांची पसंती
तटाकडील तालीम मंडळ हे अनेक गोष्टींबरोबरच मंडळाची गणेशमूर्तीचीही परंपरा जपत आले आहे. मंडळात बसवली जाणारी गणेशमूर्ती ही पूर्णपणे शाडूची असून साधारण पाच ते साडेपाच फूट उंचीची असते. मंडळाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत या गणेशमूर्तीमध्ये जराही बदल करण्यात आलेला नाही. तसेच मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग देखील पर्यावरणपूरकच वापरले जातात, असेही महेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
असा असेल राजदरबार..
तटाकडील तालमीकडून यंदा साकारण्यात येत असलेला राजदरबार हा 15 ते 16 फूट उंच असेल. 20 फूट रुंद आणि 60 फूट लांब असा हा दरबाराचा परिसर असणार आहे. या दरबारात जवळपास 20 नक्षीदार खांब आणि 10 नक्षीदार गजमुख असणार आहेत. समोर कार्यक्रमांसाठी एक छोटे व्यासपीठ असेल. तर छताला झुंबर देखील लावण्यात येणार आहे, अशी माहिती शहाजी शिंदे यांनी दिली आहे.
गणेशमूर्तीसाठीही विशेष सजावट
मंडळाची गणेशमूर्ती ही दरवर्षी मंडळाच्या इमारतीतच बसवली जाते. यंदा गणेशमूर्ती बसवताना गणेश मूर्तीसाठी अनोखी काचेची सजावट करण्यात येणार आहे. भाविकांना गणेश मूर्तीपर्यंत आपण काचेवरून जाताना अधांतरी चालत जात असल्याचा अनुभव येणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला आणि खालच्या बाजूला पूर्णपणे काचेची सजावट केली जाणार आहे, असेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून तटाकडील तालीम मंडळाकडून कोल्हापूरकरांना दरवर्षी नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळत आलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाची देखील कोल्हापूरकर आतुरतेने वाट पाहत आहेत.