कोल्हापूर : आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. त्यामुळे काहीजण खचतात. तर काही जण पुन्हा उभारी घेतात आणि यश मिळवतात. आज अशाच एका तरुणीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जिने आपल्या वडिलांच्या निधनानंतर कर्ज फेडण्याची जबाबदारी असल्याने शिक्षण सुरू असताना स्वत: चहाचा व्यवसाय सुरू केला. या तरुणीची कहाणी ही सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
advertisement
आपल्या आईसाठी कोल्हापूरची एक कॉलेजवयीन तरुणी आपला छोटासा चहाचा व्यवसाय चालवत आहे. वडिलांच्या निधनानंतर आईला फेडावे लागणारे कर्ज भागवण्यासाठी, तसेच आजारी असणाऱ्या आईला मदत करण्यासाठीच तिने हा निर्णय घेतला. यासोबतच तिने आपले शिक्षणही सुरू ठेवले आहे. त्यामुळे तिच्या या प्रयत्नांना आसपासच्या नागरिकांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे.
शिवानी पांडुरंग पाटील असे या तरुणीचे नाव आहे. ही तरुणी कोल्हापूरच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर चहा विक्री करते. मिस चायवाली, असे तिच्या चहा सेंटरचे नाव आहे. तिच्या चहा सेंटरच्या मागेच बालाजी पार्कमध्ये ती राहते. सध्या शिवानीच्या वडिलांचे निधन होऊन वर्ष झाले आहे. त्यामुळे शिवानी आपल्या आईसह घरी राहते.
ग्राहकांना मिळणार 300 युनिट मोफत वीज, अनुदानही मिळणार, नेमकी काय आहे यासाठीची प्रक्रिया?
म्हणूनच जबाबदारीचे ओझे आपल्या खांद्यावर असल्याने चहाचा व्यवसाय करायचे ठरवले आणि त्यातही स्वतःचे वेगळेपण जपले आहे. मात्र, आपल्या व्यवसायाला प्राधान्य देताना तिने शिक्षण मागे पडू दिले नाही. कोल्हापुरच्या गोखले कॉलेज याठिकाणी ती बी. कॉम. च्या दुसऱ्या वर्षाचे दूरशिक्षण पद्धतीने शिक्षण घेत आहे, अश माहिती तिने दिली.
चहाचाच व्यवसाय का?
शिवानीने जेव्हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला तेव्हा तिने विचार केला होता. कोल्हापुरात चहाप्रेमींची संख्या अमाप असल्यामुळे तिने चहा सेंटर सुरू करण्याचे ठरवले होते. त्यात कोल्हापूरकर चांगल्या चवीच्या चहासाठी लांबच्या ठिकाणीही जायला तयार असतात. त्यामुळे वेगळ्या आणि उत्तम प्रतीचा चहा विकण्याचे निर्णय शिवानीने घेतला होता. त्यासाठी सेंद्रिय गुळासह इतर घटकांची मिळून स्पेशल चहा पावडर घरीच रोज तयार करत असल्याचेही तिने सांगितले.
कर्ज फेडण्यासाठी चहा सेंटर -
तिच्या वडिलांच्या निधनानंतर शिवानीची आई मनाने खचून गेली होती. त्यात घरी एकुलती एक मुलगी असल्याने शिवानीने आईला त्रास न होऊ देण्याचा निर्धार केला होता. वडिलांनी घरासाठी आणि इतर कारणांसाठी 11 लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांच्या निधनानंतर हे कर्ज फेडण्याची जबाबदारी आई आणि शिवानीवर आली होती. त्यात शिवानीच्या आईची तब्येत वरचेवर ठीक नसते. त्यामुळेच आईकडेही लक्ष देण्यासाठी त्याच बरोबर कर्ज फेडण्यासाठी शिवानीने घराजवळच स्वतःचे चहा सेंटर सुरू केले आहे.
कसा असतो दिनक्रम?
सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत मिस चायवाली हे चहा सेंटर सुरू असते. दुपारी चहा सेंटर बंद ठेवून आईला घरकामात शिवानी मदत करत असते. तर दुपारी 3.30 पासून ते रात्री 8 पर्यंत पुन्हा शिवानी चहा सेंटरवर येत असते. पुढे रात्री घरी गेल्यानंतर घरची कामे आवरून ती स्वतःचा अभ्यासही करत असते.
दरम्यान, अशा पद्धतीने काम आणि शिक्षण यांचा मेळ घालत घरची जबाबदारी सांभाळणाऱ्या या तरुणीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. प्रत्येक जण तिच्या चहा सेंटरवर भेट देऊन तिला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हालाही जर याठिकाणी चहा प्यायची असेल तर तुम्ही खालील पत्त्यावर भेट देऊ शकतात.
पत्ता : मिस चायवाली, बालाजी पार्कजवळ, हॉकी स्टेडियम रोड, कळंबा कोल्हापूर - 416007