कोल्हापूर : कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढायला लागल्यामुळे नागरिकांनी महापुराची धास्ती घेतली होती. राधानगरी धरणाकडून येणाऱ्या पाण्याचा परिणाम पंचगंगेच्या पाणी पातळीवर पाहायला मिळाला. 25 जुलै रोजी रात्रीच कोल्हापूर शहराच्या सखल भागात पाणी साचायला लागले होते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आपली व्यवस्था केली आहे. मात्र, घरात पाणी शिरल्याने घराचे आणि प्रापंचिक साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा जोर वाढल्यानंतर पुराचा फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जिल्हा आणि राज्य मार्ग बंद झाले. कित्येक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मात्र, राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून होणारा पाण्याचा विसर्ग पंचगंगेच्या पाणी पातळीवर परिणाम करतो. त्यामुळेच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर कोल्हापूर शहरात पाणी शिरायला सुरू झाले होते.
घरात आणि दुकानात शिरले पाणी -
कोल्हापूर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये दरवेळी पाणी येत असते. त्यामुळे येथील नागरिकांना नेहमीच जीव मुठीत धरून जगावे लागते. दरवेळी कित्येक रुपयांचे नुकसान तर होते. मात्र, परिसरात जी विविध प्रकारची दुकाने आहेत, त्यांचे देखील माल आणि सामानाचे नुकसान होते. त्यामुळे जितके शक्य होईल तितके सामान नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याचे सांगितले.
शहराच्या कोणत्या परिसरात आहे पाणी?
कोल्हापूरच्या शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हिनस कॉर्नर, बापट कॅम्प, लक्षतिर्थ वसाहत, शुक्रवार पेठ, सुतारवाडा, सिद्धार्थनगर अशा रहिवासी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी निवाराकेंद्रे आणि नातेवाईकांच्या घरी अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
धरणाचा एक दरवाजा झाला बंद -
राधानगरी धरणाचे 5 दरवाजे 25 जुलै रोजी उघडले होते. त्यानंतर 26 जुलै रोजी सकाळी अजून एक दरवाजा उघडला गेल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली. मात्र, धरणाचा 1 नंबरचा दरवाजा 26 जुलै दुपारी 1 वाजता बंद झाला. त्यामुळे सध्या राधानगरी धरणाचे 3, 4, 5, 6, 7 असे एकूण 5 दरवाजे खुले आहेत. सध्या 5 दरवाजांमधून 7140 क्युसेक आणि BOT पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक, असा एकूण 8640 क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. त्यामुळे 26 जुलै दुपारी 2 वाजता राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 45 फूट 4 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 91 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत.
कोल्हापूर शहरातील पाणी आलेले ठिकाण खालीलप्रमाणे -
1.लक्षतीर्थ वसाहत आयडियल कॉलनी
2.गायकवाड वाडा पंचगंगा तालीम रोड बंद,
3.सुतार वाडा, सीता कॉलनी सीपीआर चौक,
4.खानविलकर पेट्रोल पंपाची बॅक साईड विश्वकर्मा अपार्टमेंटच्या पिछाडीस, विंग्स हॉस्पिटल समोर,
5.पोलो ग्राउंड रमणमळा पॅलेस ऑर्चिड अपार्टमेंट परिसर पाण्यामध्ये, माळी मळा, 6.जावडेकर पिछाडीस,
7.रेणुका मंदिर च्या पिछाडी ग्रहयोग आपारमेंटच्या बॅक साईडला,
8 उलपे मळा, शिये नाका रस्ता बंद,
9.मलयगिरी मुक्त सैनिक वसाहत, सफायर पार्क कदमवाडी, बापट कॅम्प स्मशानभूमी, जाधव वाडी ते कदमवाडी रस्ता पाण्यामध्ये बंद,
10.वीट भट्टी कामगार वस्ती, तावडे हॉटेल परिसर.
दरम्यान, सकाळी शहर परिसरात आलेले पाणी दुपारपर्यंत काही इंचाने कमीदेखील झाले होते. तर पावसाचा जोर कमी राहिल्यास धरणाचे दरवाजे देखील हळूहळू बंद होतील. त्यामुळे कोल्हापूरच्या नागरिकांना किंचितसा दिलासा मिळाला आहे.