कोल्हापूर : वैद्यकीय सेवेचे शिक्षण घेतल्यानंतर बहुतांशी डॉक्टर हे स्वतःच्या व्यवसायाला किंवा आपल्या पेशाला प्राधान्य देतात. मात्र त्यातूनही आपण समाजाचं काही देणं लागतो अशी भावना जोपासून समाजासाठी सेवा करणारी अगदी बोटावर मोजण्याइतकीच असतात. पन्हाळा तालुक्यातील पडळ गावामध्ये असणारा हा तरुण डॉक्टर आपली वैद्यकीय सेवा तर देतोच. मात्र त्यासोबत तो गावातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याच्या या कामाचं अगदी सर्वच स्तरातून कौतुक होतंय.
advertisement
डॉक्टर निलेश पाटील असं या तरुणाचं नाव. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यात असणाऱ्या पडळ गावामध्ये त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या निलेश यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मेडिकलमधील शिक्षण पूर्ण करून खोतवाडी आणि शिंदेवाडी या गावात दवाखाना सुरू केला. आता ते आपल्या वैद्यकीय सेवे सोबतच गावातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देतात.
बाईपण भारी! ‘उमेद’ ची पहिली महिला जालन्यातून विक्री करणार 44 उत्पादनं ऑनलाईन
वैद्यकीय पदवीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी व्हावा या हेतूने डॉ.निलेश पाटील यांनी खोतवाडी परीसरात शैक्षणिक आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवलेले आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या वैद्यकीय सेवा देण्यातसोबतच गावातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी 2017 मध्ये सावित्रीबाई ज्योतिबा फुले हे वाचनालय सुरू केलं. आज हे वाचनालय परिसरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विद्याच माहेर घर बनलंय. या वाचनालयाच्या माध्यमातून डॉक्टर निलेश पाटील हे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी मार्गदर्शन करतात आणि त्यासोबतच अकरावी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे मार्गदर्शन करतात.
यासोबतच त्यांनी आपण या समाजाचं काही देणं लागतो हे उद्देशान अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच ज्ञानज्योती फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील रस्त्यांच्यावर आणि डोंगराळ भागात हजारो झाडांचे वृक्षारोपण त्यांनी केलं. त्यांच्या या समाज कार्यामुळ आज फक्त पर्यावरणच नव्हे तर शैक्षणिक रित्याही शेकडो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय. वैद्यकीय सेवेतून मिळालेल्या वेळेत गावातील विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी विषयासाठी डॉ. पाटील मोफत शिकवणीतून मार्गदर्शन करतात. त्यांच्या या शिकवणी वर्गातून अभ्यास केलेले अनेक विद्यार्थी डाॅक्टर, वकील, इंजिनिअर क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत. डॉ. पाटील यांनी वैद्यकीय सेवेसोबत जपलेला सामाजिक वसा कोल्हापुरात कौतुकास पात्र ठरत आहे.