कोल्हापूरच्या हॉकी स्टेडियम परिसरात राहणारे रविंद्र सिध्दू गावडे हे सिनेक्षेत्रात प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करतात. आजवर कित्येक चित्रपट आणि मालिका यांच्यासाठी त्यांनी काम केले आहे. दरवर्षी ते त्यांच्या घरी गणपतीची आरास म्हणून त्यांनी काम केलेल्या मालिकांचे सेट बनवत असतात. खरंतर त्यांना मागच्या वर्षीच सिनेरसिक कोल्हापूरकरांचे श्रद्धास्थान आणि कलानगरीच वैभव असलेला जयप्रभा स्टुडिओ जसाच्या तसा उभा करायचा होता. मात्र ती गोष्ट या वर्षी शक्य झाली, असे रवी गावडे यांनी सांगितले.
advertisement
का उभारली स्टुडिओची प्रतिकृती..?
बऱ्याच सिनेकलाकार आणि तंत्रज्ञांसाठी जयप्रभा स्टुडिओ हे एक मंदिरच आहे. सध्या बंद असलेला हा स्टुडिओला कित्येकांनी जवळून पाहिले, अनुभवले आहे. हेच कोल्हापूरचे वैभव पुन्हा परत मिळावे, तिथल्या गाभाऱ्यात लाईट, कॅमेरा, ॲक्शनचा घंटानाद पुन्हा व्हावा, ही प्रत्येकाची इच्छा आहे. त्यासाठीच कोल्हापूरकर आजवर लढा देत आलेले आहेत. तर लोकांना या देखाव्याच्या माध्यमातून पूर्वीचा जयप्रभा स्टुडिओ पाहायला मिळेल आणि त्यामुळे स्टुडीओसाठी एकत्र प्रयत्न करुन हा स्टुडिओ पुन्हा लवकर सुरू करता येईल, अशी एक भावना मनात धरून मी हा स्टुडिओ घरी देखाव्याच्या रुपात जसाच्या तसा साकारला आहे, असे रवी गावडे यांनी सांगितले.
लालबागच्या राजाचं आहे कोल्हापूरकरांशी नातं, तुम्हाला माहितीय का 4 दशकांची परंपरा?
वडिलांनी स्टुडिओमध्येच घालवले आयुष्य
रवी यांचे वडील चित्रकर्मी कै. सिध्दू गावडे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ह्या स्टुडिओमध्ये घालवले होते. 1970 पासून ते इथेच वाढले आणि मोठे झाले. प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्यांनी अनेक सिनेमांचे शूटिंग इथे केले आहे. वडिलांची आठवण म्हणून ह्या स्टुडिओच्या देखाव्यात त्यांनी केलेल्या काही मोजक्या सिनेमांची पोस्टार्स लावल्याचे देखील रवी यांनी सांगितले.
रवी यांचाही स्टुडिओशी खास संबंध
खरंतर रवी यांचेही या स्टुडिओशी एक वेगळे नाते आहे. ते कॉलेज मध्ये असल्यापासून चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत अनेक सिनेमांमध्ये सहायक म्हणून काम केले होते. तर ज्येष्ठ दिग्दर्शक कै. यशवंत भालकर यांच्यामुळे पहिल्यांदा स्वतंत्र प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून 'नाथा पुरे आता' या सिनेमासाठी काम करायला मिळाले होते. रवी यांच्या चित्रपट व्यवसायाची खरी सुरुवात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टडिओ या पावन भूमीतून झाली. त्यामुळे या स्टुडिओशी त्यांच्या कुटुंबाची नाळ जोडली गेली आहे. आजवर तुझ्यात जीव रंगला, जुळता जुळता जुळताय की, प्रेमाचा गेम, जीव माझा गुंतला, सुंदरी अशा मालिका आणि कित्येक सिनेमांसाठी त्यांनी काम केले आहे.
टाकाऊ चहापूड बदलेल तुमचं नशीब, शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला मिळालं पेटंट
गणेश उत्सवानंतरही देखावा पाहता येणार
जयप्रभा स्टुडिओ बनवायचा ठरल्यानंतर त्याचा जिवंतपणा आणण्यासाठी अनुकूल अरुण सुतार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करुन त्या साकारल्या आहेत. गणपतीची आरास आणि सजावट म्हणून साकारलेला हा देखावा खरंतर लोकांनी पाहण्यासारखा आहे. त्यामुळे सध्या गणेशोत्सव काळात रवी यांच्या घरी असणारा हा देखावा नंतर देखील कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे. कोल्हापुरात चित्रपट महामंडळाचे नवीन ऑफिस बनत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हा सर्व देखावा त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.