वडिलांचं निधन आणि घरची जबाबदारी
कोल्हापुरात शिंगणापूर गावात पाटील कुटुंबातील या दोन भावांची ही कहाणी आहे. मनोज आणि मयूर पाटील अशी या दोघांची नावे आहेत. मोठा भाऊ मनोजने पहिलाच सैन्यात जाण्याचे मनाशी पक्के केले होते. पण घरी तशी परिस्थिती नव्हती. वडील महादेव पाटील यांचे व्यसनाच्या आहारी गेल्याने 2015 साली निधन झाले. मग आई रेखा आणि मामा रणजित खोत यांनी या दोघा भावांना मोठे केले. रेखा पाटील या त्यांच्या पतीच्या निधना आधी पासूनच गावातील शाळेत पोषण आहार करुन देतात. परिस्थितीची जाणीव राखून घर चालवण्यासाठी दोघा भावांनी देखील वडिलांचा भेलपुरीचा गाडा चालवायला सुरू केला. काम करतच सैन्य भरतीची शारीरिक आणि बौद्धिक तयारी करायला त्यांनी सुरुवात केली.
advertisement
कोल्हापूरच्या महिलेवर चक्क फुलपाखराचं जडलंय मन! कुठेही गेली तरी सोडत नाही साथ
अग्निवीर योजनेनं पुन्हा द्यावी लागली चाचणी
गावातील सरपंच, मामा रणजित खोत यांच्यासह सर्वांनी त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. अन् अखेर तो दिवस आला. 2019 साली मनोज याची सैन्य भरतीमध्ये निवड झाली होती. सर्वजण आनंदी होते. पण अग्निवीर योजनेच्या सुरू करण्यात आल्यामुळे सर्व निवड झालेल्यांना पुन्हा सर्व चाचण्या द्याव्या लागल्या. त्यातच पुढे कोरोनामुळे कोणतीही सैन्य भरती झाली नाही. पुढे 2021 साली अग्नीवीर मधूनच मनोज याची निवड झाली. पुढे त्याला हैदराबाद येथे ट्रेनिंग साठी जावे लागले, असे मोठा भाऊ असलेल्या मनोज पाटील याने सांगितले.
लहान भावाचाही सराव
दरम्यान, जेव्हा 2019 साली मनोजची सैन्यात निवड होणार, यासाठी त्याचा छोटा भाऊ मयूर हा देखील खुश झाला होता. मोठ्या भावाला नीट सरावासाठी वेळ देता यावा यासाठी तो सेंट्रिंग काम करण्यासाठी जायचा. 2019 नंतर मग मनोज बरोबर मयूर देखील भरतीसाठी सराव करू लागला. पण 2021 साली मयूरच्या प्रयत्नांना मोठ्या भावासोबत यश आले नाही. त्यामुळे मयूर निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाला.
ही दोस्ती तुटायची नाय.., 23 नंबरची खोली अन् मॅडी - नांगरे पाटील यांच्या मैत्रीचे भन्नाट किस्से
लहान भावाचंही सिलेक्शन
मयूरच्या बाबतीत अनपेक्षित गोष्टी घडल्या. त्याने आशा सोडल्यानंतर अचानक त्याला 'तुमचे सिलेक्शन झाले आहे असा फोन आला.' खरंतर वेटींग लिस्ट मधील काही नावे सिलेक्ट केल्यावर मयुरची अग्निवीर भरतीत निवड झाली होती. पण विश्वास न बसल्यामुळे त्याने थेट मंगलोर येथे जाऊन चौकशी केली. तर खरेच त्याची निवड झाली होती. पुढे वेळ न घालवता लगेचच थेट मिळालेल्या हैदराबाद येथीलच सेंटरवर ट्रेनिंगसाठी हजर झालो होता, असे लहान भाऊ मयूर पाटील याने सांगितले आहे.
एकाच ठिकाणी झालं प्रशिक्षण
हैदराबाद या एकाच ठिकाणी दोघा भावांनी 31 आठवड्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले आहे. योगायोगाने दोघांचे ट्रेनिंगही एकाच ट्रेडमध्ये झाले आहे. तर दोघांनीही एकत्रच 5 ऑगस्ट 2023 रोजी सैन्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे आई रेखा पाटील यांना तर आपले आयुष्य सार्थकी लागल्याचे वाटत आहे. माझा अजून एखादा मुलगा असता त्याला देखील अभिमानाने सैन्यातच पाठवलं असतं, अशी भावना रेखा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, गावातल्या या सख्ख्या भावांनी आपल्या घरची परिस्थिती बेताचीच असताना कष्टाने यश संपादन केलं. एकत्रच मिळवलेल्या त्यांच्या या यशाबद्दल गावकरी, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.