कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदीला येणाऱ्या पुरामुळे कोल्हापूरकर बाधित होत असतात. पण बाहेरून कोल्हापूर शहरात येणाऱ्यांना तसेच पुणे-बंगळुरू महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. कारण पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अर्थात NH4 हायवेवर पंचगंगा नदीचे पाणी 2019 आणि 2021 या दोन्ही महापूराच्या वेळी आले होते. तेव्हा बराच काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. आता अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होते की काय, याबाबत नागरिक संभ्रमात असलेले पाहायला मिळत आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्याला बसत असलेल्या महापुराच्या तडाख्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच हे महापुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या शेतामध्ये आणि आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरले आहे. गेले 2-3 दिवस थोड्या थोड्या प्रमाणात हे पाणी वाढू लागले आहे. सध्या पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील इंचा-इंचाने वाढ होत असल्यामुळे महामार्ग बंद होतो की काय, हा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. मात्र, सद्यस्थितीला या महामार्गावरून वाहतुकीस कोणती समस्या उद्भवलेली नाही.
पुरामुळे नाही, तर ट्रॅफिकमुळे नागरिक हैराण -
सध्या जरी पुराचे पाणी पुणे-बंगळुरू महामार्गावर आले नसले तरी नागरिकांना या महामार्गावरुन प्रवास करणे नकोसे वाटू लागले आहे. सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळेच सध्या याठिकाणी अगदी संथगतीने वाहतूक सुरू आहे. त्यातच आता सांगली फाट्यानजीक सर्व्हिस रोडवर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे सगळी वाहतूक एकाच रोडवरून वळवण्यात आल्याने जास्तच ट्रॅफिक जाम होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
pune rain update : पावसाच्या पाणी घरात घुसलं, 26 सापही आढळले, पुण्यातील धक्कादायक प्रकार, VIDEO
अजून 2 ते 3 फूट पाणी वाढल्यास महामार्ग बंद -
महामार्गावर जरी पाणी आले नसले तरी महामार्गाच्या जवळ पाणी पोहोचले आहे. जर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिला, तर पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे जर अजून किमान 3 फुटाच्या आसपास पाणी पातळीमध्ये वाढ झाली, तर नक्कीच महामार्गावर सांगली फाट्याजवळ पाणी येऊ शकते.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 27 जुलै रोजी 47.6 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस चंदगड तालुक्यात 76.7 मिमी झाला आहे. सन 2024 मधील जून ते जुलै आज अखेर 959.9 मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यातच धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदी 27 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या आकडेवारीनुसार 47 फूट 6 इंचावरुन वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात आली आहे.