लातूर : अनेकजण आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिवाचं अगदी रान करतात. तर आपलं स्वप्न मुलांमार्फत जगणं हे आई-वडिलांसाठीही सुखद असतं. काही मुलं तर आई-वडिलांच्या मागे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतात.
लातूरचे मयूर महादप्पा गबुरे हे त्यापैकीच एक. मयूर यांच्या वडिलांचा हार्डवेअरचा व्यवसाय होता. वडिलांच्या निधनानंतर हा व्यवसाय ठप्प झाला. आज हाच व्यवसाय पुन्हा सुरू करून मयूर वर्षाकाठी उलाढाल करतात कोट्यावधी रुपयांची.
advertisement
मयूर हे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याच्या कासार शिरसीचे रहिवासी. त्यांचे वडील महादप्पा गबुरे यांनी 2000 साली हार्डवेअरचा व्यवसाय सुरू केला होता. 2010 साली सारंकाही सुरळीत असताना महादप्पा यांचं आकस्मित निधन झालं. घरातील कर्ता पुरुष गेला, त्यामुळे अख्खं घर कोलमडलं. त्यांचा व्यवसायही ठप्प झाला. त्यावेळी मयूर अवघ्या 22 वर्षांचे होते. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी 10 वर्षे कसंबसं घर सावरलं.
मग 2020 साली पुन्हा एकदा वडिलांचा हार्डवेअर व्यवसाय सुरू केला. मयूर यांनी त्यांच्या वडिलांचीच व्यवहाराची पद्धत वापरली. अगदी 4 वर्षांतच त्यांच्या व्यवसायाची मोठी भरभराट झाली. 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून सुरू झालेल्या या व्यवसायातून 4 वर्षांतच लाखोंचा नफा मिळू लागला. व्यवसायातील बारकावे मयूर यांना लहानपणीच वडिलांनी शिकवले होते. तेच त्यांच्या कामी आले. मयूर यांनी ग्राहकांशी आपुलकी वाढवली. आज हार्डवेअरच्या व्यवसायातून त्यांची वर्षाकाठी तब्बल सव्वा कोटी रुपयांची उलाढाल होते.