शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती राज ठाकरे यांनी आम्ही दोघेजण एकत्र येण्याला काहीजण खोडा घालत असल्याचे सांगितले. राज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आता शिवसेना-मनसे युतीबाबत भाष्य केले आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांनी काय म्हटले?
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे-मनसेसोबत युती करणार का असे विचारले. त्यावर उद्धव यांनी उत्तर देताना म्हटले की, महाराष्ट्राचे लुटारी सत्तेत नको. पण त्यांनी (राज ठाकरे) कोण मुख्यमंत्री हवंय हे सांगितले आहे. महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्यांना त्यांचा पाठिंबा असेल तर माझी त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही असे उद्धव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यांना लुटारूंना सत्तेत बसवायचे आहे. मी महाराष्ट्राला बांधिल आहे. लुटारूंना सत्तेत बसवण्यासाठी नसल्याचे उद्धव यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर मनसेने आता विधानसभा निवडणुकीत आपले 100 हून अधिक उमेदवार उभे केले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार असेल असे वक्तव्य राज यांनी केले होते. तर, निवडणुकीचे पडघम वाजताच राज यांनी मनसे हा सत्तेतील पक्ष असणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी या भूमिकेचा पुनरुच्चारही केला होता.
राज यांनी काय म्हटले होते?
दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत भाष्य केले. मी आणि उद्धव एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्न करत असल्याचे राज ठाकरे आहेत. यामध्ये काहीजण आतले आहेत आणि बाहेरचेही असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राचे चित्र बदलेल असे वाटत नाही का, या प्रश्नावर बोलताना राज यांनी मी काय करणार आणि बोलणार तरी काय, असे म्हटले.
