मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील दुकाने, मॉल, हॉटेल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि अन्य व्यावसायिक आस्थापना २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. उद्योग विभागाने यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाइट लाइफचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने विरोध केला होता.
advertisement
उद्योग विभागाने याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. आठवड्यातील सर्व दिवस ही आस्थापने खुली राहू शकतात. यापूर्वी मद्याच्या दुकानांबाबत गल्लत होत असल्याने पोलिसांकडून इतर दुकानेही रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास अडथळे येत होते. त्यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी हे नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आस्थापने जरी 24 तास सुरू ठेवण्याची मुभा असली, तरी तेथील प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान सलग 24 तासांची विश्रांती म्हणजेच साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात बुस्टर मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्याशिवाय, रात्री उशिरापर्यंत अथवा रात्रपाळीत काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मद्य विक्रीचं काय?
राज्यात आता उद्योग विभागानुसार, हॉटेल्स, मॉल 24 तास सुरू राहणार आहेत. मात्र, बार मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परमिट रुम, हुक्का पार्लर, देशी बार, मद्यपान गृहे यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे ही आस्थापने नियमानुसार असलेल्या वेळेतच सुरू राहणार आहेत.
नव्या निर्णयानुसार 24 तास काय सुरू काय बंद?
हॉटेल
सिनेमागृह
नाट्यगृह
निवासी हॉटेल
मनोरंजनासंदर्भातील आस्थापनं
सर्व दुकाने
काय बंद राहणार?
बार
वाईन शॉप
हुक्का पार्लर
देशी बार
बार परमिट रूम