महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय आता दिल्लीतून होणार आहे. आज दिल्लीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत अमित शाह यांची बैठक पार पडणार आहे. त्यापूर्वी, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील निकाल आणि संभाव्य मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
शाह-तावडे यांच्या बैठकीत काय झाले?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, याचा अमित शाह यांनी अंदाज घेतला. त्याशिवाय, राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी चर्चा करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेताना शाह धक्कातंत्र वापरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत आज होणार निर्णय?
राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस मतदान झाले. महायुतीच्या पारड्यात 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार आहे.
