विजय वंजारा, प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. अन्न-पाण्याची, पावसाची तमा न बाळगता लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दोन दिवसांपासून अत्यंत चिवटपणे आरक्षणाच्या मु्द्यावर आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलन सुरू असताना दुसरीकडे शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामुळे आज तरी मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर तोडगा निघणार का, याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
advertisement
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात शनिवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर जवळपास तासभर चाललेली बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असल्याने राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर ताण पडत असून, नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाला कसे हाताळायचे आणि पुढील भूमिका काय असावी, याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपसमितीला स्पष्ट आदेश दिले की, जरांगे यांच्या मागण्यांबाबत ठाम भूमिका घ्यावी आणि त्यावर दोन दिवसांत निर्णय द्यावा. तसेच, उपसमितीने थेट जरांगे पाटील यांची भेट घेऊन संवाद साधावा, अशी सूचनाही मुख्यमंत्री यांनी केली. यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न मानला जात आहे.
यातील विशेष बाब म्हणजे ही बैठक अत्यंत गुप्तपणे पार पडली. सुरुवातीला शासकीय वाहनांतून आगमन झाले असले, तरी बैठक संपल्यानंतर विखे पाटील आणि गिरीश महाजन हे खाजगी गाडीतून वर्षा निवासस्थानाबाहेर पडले. त्यामुळे या बैठकीत काय घडलं, याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्णायक टप्प्यात असताना झालेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारकडून महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.