मराठी भाषेच्या हक्कांसाठी मीरा रोड येथे आज (मंगळवार) मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्च्याआधीच नाट्यमय घडामोड घडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याशिवाय मनसे आणि इतर मराठी संघटना, संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. बिगर मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, त्यावेळी पोलीस कुठे गेले होते, असा सवाल करण्यात आला.
advertisement
पोलिसांच्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया...
पोलिसांकडून मराठी संघटनांच्या मोर्च्यावर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी काही सामान्य मराठी भाषिकांनादेखील ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानदाराला मनसैनिकांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 3 जुलै रोजी बिगर मराठी व्यापारी दुकानदारांनी बंद पुकारत मोर्चा काढला होता. या मोर्चात मराठीभाषिकांविरोधातही टिप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा मोर्चाला भाजपची फूस असल्याचा आरोप केला. मारहाणी मागील घटना सांगताना मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान सहन कसा करायचा असा सवाल केला. या मोर्चाविरोधात 8 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर विविध मराठी संघटनांसह आज मनसेने मोर्चाची हाक दिली होती. मात्र, मोर्चा आधीच पोलिसांनी जाधवांना अटक केली.