मुसळधार पावसामुळे कुर्ला, अंधेरी, दादर आणि हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. हिंदमाता भागात नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अनेक ठिकाणी बस, टॅक्सी आणि खासगी वाहनं पाण्यात अडकली आहेत. काही दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोरेगावमधील मोरारजी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून नागरिकांना गढूळ पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाक्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या आहेत.
advertisement
Monsoon Tips : पूरजन्य संकटात अडकलात? घाबरू नका, या सोप्या गोष्टी करा फॉलो
रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सतत सुरू असलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. हार्बर लाईनवरील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. सेंट्रल लाईवरील वाहतुकीवर देखील पावसामुळे परिणाम झाला असून प्रवाशांचे हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी स्टेशनच्या छतांना गळती लागल्याने स्टेशनवर सुद्धा पाणीच पाणी झालं आहे.
शाळांना सुट्टी
पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने शाळांना सकाळच्या सत्रानंतर सुट्टी जाहीर केली आहे. मुलांना सुरक्षितपणे घरी सोडण्याच्या सूचना, शाळा व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हवामान अंदाज
हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईचं कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. वाऱ्याचा वेग ताशी 15 ते 30 किलोमीटर असून दिशा पश्चिम आणि दक्षिण पश्चिम अशी आहे. पुढील काही तास मुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.





