सांगली महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईने विष प्राशन करत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
सांगलीच्या प्रभाग 16 मधून शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमर गवंडी हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राजेश नाईक हे निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीतून माघारीसाठी उमर गवंडी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याने त्यांच्या आई मुमताज गवंडी यांनी विष प्राशन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
advertisement
या घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे शासकीय रुग्णालयासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे.
'उमेदवाराला प्रचार करू देत नाही'
"सोमवारपासून आम्ही उमेदवारांच्या भेटी घेत आहे. आमच्या उमेदवाराच्या वार्डात गेले होते. त्यावेळी त्यांचा फोन बंद होता. मी कार्यकर्त्यांकडे विचारणा केली असता त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली आहे. त्याबद्दलच्या ऑडिओ कॉल सुद्धा माझ्याकडे आहे. अशी दडपशाही विरोधकांनी आपल्या घरात वापरावी, लोकशाहीमध्ये हे खपवून घेणार नाही, जनता सुज्ञ आहे. लक्षात ठेवा, सोलापुरात जे घडलं तेच सांगलीत घडू शकते. उमेदवाराच्या आईने विष प्राशन केलं आहे. प्रचारासाठी इथं फिरू नका, अशी दमदाटी केली जात आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या उषाताई जाधव यांनी केला आहे. तसंच, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर थेट समोरासमोर येऊन लढा, असं भेकडा सारखा दबाव टाकू नका, अशा इशाराही जाधव यांनी दिला.
काँग्रेसकडून कोणताही दबाव नाही
"वार्ड क्रमांक १६ मध्ये प्रचार सुरू आहे. कुणावरही दबाव टाकला नाही. घरगुती कारणातून त्यांनी विषबाधा केली आहे. पण विरोधकांनी याचं भांडवल केलं आहे. आमच्या आघाडीचे काम करत होते. असं काहीही घडलं नाही. त्यांच्या आईची तब्येत आता ठीक आहे. याचं कुणीही राजकीय भांडवल करू नये, असं म्हणत काँग्रेसचे उमेदवार राजेश नाईक यांनी केलं.
